नवरात्रीसाठी खास वेगळे उपवासाचे पदार्थ

नवरात्रीसाठी खास वेगळे उपवासाचे पदार्थ

राजगिरा बटाटा थालीपीठ

साहित्य:-

2 बटाटे उकडून, राजगिरा पीठ 1 वाटी, 2 हिरव्या मिरच्या, मीठ, साखर चवीप्रमाणे, तूप.

कृती :-

बटाटे सोलून, कुस्करून घ्यावेत. त्यात राजगिऱ्याचे पीठ, हिरवी मिरची, मीठ, साखर घालून पाणी घालावे व पीठ मळून घ्यावे. बटर पेपरला तूप लावून मध्यम आकाराचे थालीपीठ लावावे. मध्ये छिद्र पाडावे. तापल्या तव्यावर टाकावे. कडेने व मध्ये तूप घालून मंद गॅसवर थालीपीठ खमंग भाजावे व दह्यात कालवलेल्या दाण्याच्या चटणीबरोबर गरमागरम थालीपीठ द्यावे.

भरवा पराठा 

साहित्य:-

वाटीभर राजगिरा पीठ, 2 बटाटे उकडून, 2 चमचे ओले खोबरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, लिंबाचा रस, तूप, बेदाणे.

कृती;-

बटाटे सोलून किसावेत. त्यात राजगिरा पीठ व चिमूट मीठ घालून मळून ठेवावे. तुपाचा हात आवश्यपक तर मळताना लावावा व गोळा करावा. नारळ चव, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, साखर, लिंबाचा रस व बेदाण्याचे तुकडे घालून सारण बनवावे. भिजवलेल्या पिठातला गोळा घेऊन राजगिरा पिठावर पारी लाटावी. त्यात सारणाचा गोळा ठेवून बंद करावी. राजगिरा पिठावरच हलका पराठा लाटावा. हाताने हलके थापत मोठा करावा. चिरा पडतील त्या नीट करून घ्याव्यात. तापल्या तव्यावर दोन्हीकडून तूप सोडून खमंग भाजावा. दही, चटणीबरोबर सर्व्ह करावा.

इंदुरी उपवासाचे चॅट

साहित्य:-

वाटीभर शिंगाडा पीठ, तिखट, मीठ एकत्र करावे. त्यात पाणी घालून शेवेच्या पिठाप्रमाणे भिजवावे. त्यात 2 चमचे गरम तूप घालावे. तूप लावून मळून घ्यावे. तापल्या तुपात मंद गॅसवर सोऱ्याने कढईत शेव पाडून खमंग तळावी.
भिजलेला साबुदाणा दीड वाटी, मीठ, साखर, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर.

कृती:-

कढईत तूप घालून साबुदाणा टाकावा. मीठ, साखर, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मंद गॅसवर परतावे. कोथिंबीर घालावी. प्रथम शिंगाड्याची शेव, त्यावर उकडलेल्या बटाट्याचा कीस, दाण्याचे कूट, चिमूट मीठ, तयार साबुदाणा, बटाटा सली, ओले खोबरे, काजू, बेदाणे, 2 चमचे दही घालावे. वरून कोथिंबीर व चाट मसाला भुरभुरून इंदुरी उपवासाचे चॅट सर्व्ह करावे.

बटाटापूरी

साहित्य:-

२ मोठे बटाटे, उकडलेले, १/२ कप साबुदाणा, ७ ते ८ मिरच्या, १/४ कप कोथिंबीर, चिरून, १/२ टिस्पून जिरे, ३ टेस्पून शेंगदाणा कूट, १ टिस्पून जिरेपूड, १ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप), चवीपुरते मिठ, तळण्यासाठी तेल

कृती:-

१/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे. मिक्सरमध्ये ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मिठ घालून बारीक करावे. पाणी घालू नये. शिजवलेले बटाटे किसून घ्यावे. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवावा. चव पाहुन, लागल्यास मिठ घालावे. मध्यम दिड इंचाचे गोळे करावे. तेल तापत ठेवावे. तेल तापले कि आच मिडीयम हायवर ठेवावी. एक प्लास्टिकचा जाड तुकडा घ्यावा. त्याला तेलाचा हात लावावा. प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापावा आणि मध्यभागी बोटाने भोक पाडावे. पातळ थापू नये, नाहीतर तेलात टाकल्यावर पुरी तुटते आणि विरघळते. पुरी तेलात टाकल्यावर ती झार्यााने अजिबात पलटू नये. पुरी पलटली ती हमखास तुटते. त्यावेळी झार्याटने अलगद तेलात बुडवावी म्हणजे वरच्या बाजूलाही छान ब्राऊन रंग येईल. तळलेल्या पुर्यात चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.

वरी आणि अळिवाची खांडवी

साहित्य :-

एक वाटी वरी तांदूळ, पाव वाटी तूप, चवीला मीठ, पाव वाटी अळीव, अर्धी वाटी ओले खोबरे, दीड वाटी गूळ, दोन वाट्या गरम पाणी, अर्धी वाटी गरम दूध, अर्धा चमचा जायफळपूड, 10-12 काजू.

कृती :-

अळीव दुधात दोन तास भिजत घालावेत. वरी तांदूळ धुवून घ्यावेत. एक मोठा चमचा तूप गरम करून त्यात तांदूळ परतावेत. मीठ आणि पाणी घालून शिजवावे. उरलेले तूप गरम करून त्यात काजू परतावेत. खोबरे, अळीव तसेच गूळ घालून शिजवावे. मिश्रण थोडे चिकट झाले, की शिजलेले वरी तांदूळ घालून ढवळावे. तांदूळ मोकळे होईपर्यंत ढवळावे, जायफळपूड घालावी.
एका थाळीला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण घालून थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

रताळी-साबूदाणा पुडिंग

साहित्य :-

रताळ्याचा कीस दोन वाट्या, एक वाटी भिजलेला साबूदाणा, दीड वाटी दूध, एक वाटी साखर, एक मोठा चमचा तूप, अर्धा चमचा जायफळपूड, पाव वाटी काजूचे तुकडे.
कृती :- तूप गरम करून त्यात रताळ्याचा कीस परतावा. त्यात दूध आणि साबूदाणा घालून शिजवावे, साखर घालावी. मिश्रण घट्ट झाले, की त्यात जायफळपूड घालून तुपाचा हात लावलेल्या भांड्यात ओतावे. काजूने सजवावे, फ्रीजमध्ये थंड करावे.

वरीच्या तांदळाचा पुलाव

साहित्य:-

एक कप वरीचा तांदूळ, दोन टेबलस्पून तूप, दोन लवंगा, जिरे, दोन- तीन मिरच्यांचे तुकडे, अर्धा इंच आले, साखर व मीठ चवीनुसार, अर्धा कप दाण्याचा कूट, दहा-बारा बेदाणे, अर्धा कप रताळ्याच्या फोडी, कोथिंबीर, दहा-बारा काजूचे तुकडे कृती- वऱ्याचे तांदूळ धुवून ठेवावेत. एका मोठय़ा भांडय़ात तूप गरम करून त्यात जिरे, लवंग, मिरचीचे तुकडे घालावेत. वरी तांदूळ घालून अंदाजे पाणी घालावे. त्यात बटाटय़ाच्या फोडी आणि रताळ्याच्या फोडी घालाव्यात. दाण्याचा कूट, मीठ आणि साखर घालून शिजवून घ्यावे. दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तूप घालून काजू आणि बेदाणे परतून घ्यावेत. हे त्या वरीवर घालून छान मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालून छान वाफ द्यावी. टीप- सुरणाच्या फोडी, रताळ्याच्या फोडी वेगळ्या शिजवून तुपात थोडय़ा परतून शेवटी वऱ्याच्या तांदळात मिसळल्या तरी चालतात.

उपवासाचे गुलाबजाम

साहित्य-

सव्वाशे ग्रॅम खवा, एक टेबलस्पून अरारूटचे पीठ, एक कप साखर, एक कप पाणी, चिमूटभर खायचा सोडा (उपवासाला चालत असेल तर), तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल घेतले तरीही चालेल.

कृती-

माव्यात अरारूटचे पीठ घालून चिमूटभर खायचा सोडा घाला. थोडे दूध घालून मळून घ्या. २०-३० मिनिटं गोळा तसाच ठेवा. नंतर पुन्हा मळून घ्या. छोटे गोळे करून तळून घ्या. साखरेच्या गरम एकतारी पाकात गार गुलाबजाम टाकावेत.

उपवासाचा बटाटावडा

साहित्य:-

तीन बटाटे, शेंगदाणे तेल किंवा साजूक तूप, एक टीस्पून जिरे, एक टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, राजगिरा, शिंगाडा, साबुदाणा किंवा केळ्याचे पीठ अर्धा कप.

कृती:-

बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत. कढईत तेल किंवा तूप घेऊन त्यात जिऱ्याची फोडणी करावी. त्यात आलं मिरची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून स्मॅश केलेला बटाटा परतून घ्यावा. वर दिलेले कोणतेही पीठ घेऊन नेहमीसारखे बटाटेवडे तळावेत

उपवासाची कंदमुळांची टिक्की

साहित्य:-

करांदे, अळ्कुड्या, सुरण / रताळे, , शिंगाडा, वरी तांदूळ, तेल, खिसलेलं खोबरं, जिरं, कापलेली मिरची, आल्याची पेस्ट, मीठ

कृती:-

सारी कंदमुळं कुकरमध्ये किंवा मोदक पात्रात शिजवून घ्यावीत. नंतर ती सारी कुस्ककरून त्यात आल्याची पेस्ट व मीरपूड मिसळावे. यामुळे पिष्टमय पदार्थामुळे पोटफुगीचा होणारा त्रास कमी होतो. त्यानंतर हळूहळू त्यात मिरची, खोबर, जिरं मिसळून त्याच्या लहान लहान टिक्की बनवाव्यात.
वरीच्या तांदूळामध्ये ही टिक्की घोळवून तेलामध्ये शॅलोफ्राय करावीत.

उपवासाचा केक

साहित्यः-

शिंगाड्याचे पीठ २०० ग्रॅम.
साजूक तूप १०० मिली.
पिठी साखर १०० ग्रॅम
खजूर २० बिया
बेकिंग पावडर एक टीस्पून
खायचा सोडा अर्धा टीस्पून
अर्धा टीस्पून वेलची पावडर
नेसकॉफी चार पाकिटे १ रू. वाली
दीड वाटी दूध
साधी साखर तीन टीस्पून
बदाम सजावटीसाठी

कृती:-

अर्धी वाटी दूध गरम करावे. खजूराच्या बिया काढून या दुधात भिजत घालावे. शिंगाड्याचे पीठ, कॉफी पावडर, बेकिंग पावडर, सोडा. वेलची पावडर एकत्र करून तीन वेळा चाळून घ्यावे. खजूर दुधासकट मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यावा. ओव्हन १८० डिग्रीवर पाच मिनिटे प्रिहीट करून घ्यावा. तूप, पिठी साखर, वाटलेला खजूर एकत्र परातीत घेऊन फेसावे. चाळलेले पीठ फेसलेल्या तुपात मिसळून फेसावे. लागेल तसे दूध मिसळावे. त्या मिश्रणात साधी साखर घालून नीट मिसळावी. यामुळे साखर असलेल्या ठिकाणी साखर विरघळून छान जाळी पडते. सजावटीसाठी बदामाचे काप घालावे. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात मिश्रण ओतावे.
१८० डिग्रीवर पस्तीस मिनिटे ठेवावे. झाकण काढून सुरी घालून मिश्रण चिकटत नाही ना ते पहावे.
दहा मिनिटे गार करून जाळीवर केक काढावा.

उपवासाचा दहीवडा

साहित्य:-

बटाटे-400 ग्राम
शिंगाड्याचे पीठ-50 ग्राम
काळे मीठ-स्वादानुसार
काळी मिरी पावडर-1 छोटा चमचा
कोथिंबीर
दही-400 ग्राम
तूप-दहीवडे तळण्यासाठी

कृती-

बटाटे उकडून,गार करून सालं काढून घ्या.बटाटे कुस्करून त्यात शिंगाड्याचे पीठ,काळे मीठ,काळी मिरी पावडर,कोथिंबीर घालून चांगले कालवून घ्या.दही चांगले फेटून त्यात काळे मीठ,चिमूट साखर घालून कालवा.कढईत तूप तापत ठेवा.सारण चिकट असल्यामुळे पाण्याने हात ओला करून वड्याचा आकार देऊन वडे कढईत तळायला टाका.सोनेरी होईपर्यंत चांगले तळून घ्या.वडे थोडे गार झाल्यावर दह्यात बुडवा.खायला देताना कोथिंबीर घाला.
टीप-वरील पाककृती उत्तरेकडची.आपण त्यामध्ये बदल करू शकता,जसे काळ्या मिरीऐव????जी हिरवी मिरची वाटून वा काळ्या मिठाऐवजी साधे मीठ वापरावे.

उपवास नसेल तरीही खाऊ शकता.

1 Trackback / Pingback

  1. Navratri diet plan: how to lose weight in navratri fast? - Health Yogi

Leave a Reply

Your email address will not be published.