
पुरणपोळी (साखरेची)
साहित्य :
चार वाट्या चण्याची डाळ
साडेतीन वाट्या (जास्त गोड हवी असल्यास, चार वाट्या) साखर
एक वाटी रवा
एक वाटी मैदा
दहा-बारा वेलदोडे
केशर अगर केशरी रंग
अर्धी वाटी तेल
दोन वाट्या तांदळाची पिठी
अर्धा चमचा मीठ
केशर न घालता रंगच घातल्यास अर्धे जायफळ.
कृती :
जास्त पाण्यात डाळ चांगली शिजवून घ्यावी.
गरम असतानाच चाळणीत ओतून त्याचे सर्व पाणी काढून घ्यावे.
हे पाणी कटाच्या आमटीकरिता उपयोगात आणावे.
डाळ गरम असतानाच त्यात साखर घालून पुरण शिजवून घ्यावे.
थंड झाल्यावर पुरण वाटावयाच्या यंत्राने अगर पाट्यावर चांगले वाटून घ्यावे.
वाटताना त्यात वेलदोड्यांची पूड व जायफळाची पूड घालावी, याप्रमाणे पुरण तयार करावे.
कणीक प्रथम पिठाच्या चाळणीने चाळून घेऊन, पाण्यात घट्ट भिजवून घ्यावी.
एक तासानंतर पाणी लावून लावून, कुटून अगर मळून नरम करावी.
नंतर मीठ घालून परत चांगली मळावी.
एका भांड्यात तेल घालून, त्यात ती कुटलेली कणीक ठेवून द्यावी.
त्यातील थोडी कणीक घेऊन गोळा करावा व त्याच्या दुप्पट पुरण घेऊन त्याचा गोळा करावा.
कणकेच्या गोळ्यात तो घालून त्याचा उंडा करावा व पिठी घेऊन त्यावर हलक्या हाताने पातळ पोळी लाटावी.
तव्यावर टाकून ही पोळी बदामी रंगावर भाजून काढावी.
टीप :
१. गुळाच्या व साखरेच्या पोळीमध्ये खवा (मावा) आणि ओल्या नारळाचे खोबरे यांपैकी काहीही एक अगर दोन्ही घालतात. घालावयाचे असल्यास पुरण शिजतानाच पाव किलो मावा व खोवलेले खोबरे दोन वाट्या घालावे. या पोळ्या चवीला विशेष चांगल्या लागतात.
२. तसेच, या पोळ्या भाजताना खाली व वर एकेक चमचा तूप सोडल्यास त्या जास्त खमंग लागतात.
Leave a Reply