
पनीर पसंदा
टिक्की साठी साहित्य :
किसलेलं पनीर दीड वाटी
बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा
काळे मिरे भरडून पाव चमचा
मैदा चार चमचे
मीठ
टिक्की परतून घेण्यासाठी तेल चार चमचे
कृती:
टिक्कीसाठी दिलेले सगळे जिन्नस एकत्र करून गोळा मळून घ्यावा. त्याचे सहा चपटे गोळे करून ते ब्रेडचा चुरा अथवा रव्यावर घोळवून नॉन स्टिक तव्यावर तेल सोडून त्यावर परतून घ्यावेत.
दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत सगळ्या टिक्की परतून घ्याव्यात.
कांदा-लसणाचं वाटण – साहित्य : चिरलेला कांदा पाऊण वाटी, लसूण पाकळ्या पाच, पेरंभर आल्याचा तुकडा, चार चमचे काजू.
कृती : पाऊण वाटी पाणी गरम करून त्यात सगळे जिन्नस घालावेत.
नीट ढवळून पंधरा-वीस मिनिटं शिजू द्यावे. गार झाल्यावर शिजवलेलं मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यावं.
तळलेल्या कांद्याचं वाटण – साहित्य :
तळण्यासाठी तेल
उभा चिरलेला कांदा अर्धी वाटी
कृती:
कांदा सोनेरी तपकिरी रंगाचा होईपर्यंत तेलात तळून घ्यावा.
जास्तीचं तेल टिपलं जाण्यासाठी कागदावर काढून ठेवावा नंतर मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यावा.
ग्रेव्हीसाठी साहित्य :
तेल वा तूप चार चमचे
लाल तिखट एक चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
ताजं दही फेटून पाऊण वाटी
मीठ
कृती:
चार चमचे तेल गरम करून त्यावर कांदा-लसणाचं तयार वाटण घालावं.
मंद आचेवर काही मिनिटं शिजू द्यावं. नंतर लाल तिखट, पंजाबी गरम मसाला घालून आणखी काही मिनिटं शिजू द्यावं.
फेटलेलं दही घालून पाच मिनिट भराभर हलवावं.
आता तळलेल्या कांद्याच वाटण आणि मीठ घालून ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत शिजवावं.
अर्धी वाटी पाणी घालून ग्रेव्ही उकळू द्यावी.
खायला देताना आधी पनीर टिक्की घालाव्यात. त्यावर तयार ग्रेव्ही गरमागरमच ओतावी.
वरून कोथिंबीर पेरून सजवावं.
Leave a Reply