
कोफ्ता करी
साहित्य :
दुधी भोपळ्याचा कीस दोन वाट्या,
चण्याचे पीठ अर्धी वाटी,
दोन कांदे,
लसूण चार-पाच पाकळ्या,
दोन टोमॅटो,
आठ-दहा हिरव्या मिरच्या,
मीठ, हळद, कोथिंबीर,
पाव वाटी कच्चा मसाला,
पाव वाटी खसखस,
पाव वाटी तीळ,
पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट,
आल्याचा एक बोट लांबीचा तुकडा,
ओले खोबरे एक वाटी,
तळण्यासाठी तेल अगर तूप.
कृती :
कोफ्ता
सर्वप्रथम दुधी भोपळ्याचा कीस करून घ्या
दुधी भोपळ्याच्या किसाला जास्त पाणी सुटल्यास कीस जरा पिळून काढा.
दुधी भोपळ्याचा कीस, चण्याचे पीठ, चवीप्रमाणे लाल तिखट किंवा मिरच्यांचा ठेचा,
थोडेसे तेल, चवीप्रमाणे मीठ, थोडी हळद व थोडी चिरलेली कोथिंबीर असे सर्व साहित्य एकत्र करून मळावे.
मळलेल्या मिश्रणाचे कोफ्ते बनवून घ्यावेत
तेलात अगर डालडा तुपात कोफ्ते तळून घ्यावेत.
करी
एका पातेल्यात चार चमचे तेल अगर डालडा घालून ते पातेले गॅसवर ठेवावे व कांदे चिरून, त्यात घालून तांबूस रंगावर परतून घ्यावेत.
नंतर त्यात पाऊण चमचा हळद, ओल्या मिरच्या (वाटून) आणि टोमॅटो (बारीक चिरून) घालावेत.
टोमॅटो शिजल्यावर, आपल्याला दाट अगर पातळ पाहिजे असेल, त्या प्रमाणात पाणी घालून उकळी आणावी.
खसखस व तीळ भाजून घ्यावे.
भाजलेले तीळ आणि खसखस, भाजलेल्या शेगदाण्याचे कूट, आले, खोबऱ्याचा कीस आणि लसणीच्या पाकळ्या असे सर्व एकत्र करून वाटावे
तो वाटलेला गोळा वरील उकळत्या पाण्यात घालावा.
तसेच, कच्चा मसाला व चवीप्रमाणे मीठ घालावे आणि पुन्हा उकळी आणावी.
उकळी आल्यानंतर गॅस बंद करून कोफ्ते टाकावेत.
खाली उतरवून कोथिंबीर घालावी.
जिरा भात किंवा पुलावासोबत सर्व्ह करावे. रोटी किंवा चपातीसोबतही खाऊ शकता.
Leave a Reply