
भरल्या वांग्याचा भात
साहित्य :
अर्धा किलो बासमती तांदूळ
पाव किलो छोटी वांगी
पाऊण वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
पाव चमचा हळद
दीड चमचा गरम मसाला
एकच चमचा धने-जिरंपूड
मीठ
दोन साधारण आकाराचे कांदे बारीक चिरून
पाव वाटी तेल
कोथिंबीर
फोडणीसाठी
मोहरी आणि हिंग, कढीपत्ता, तमालपत्र.
कृती :
तांदूळ धुऊन निथळत ठेवावा. कांदा तेलावर मंच आचेवर लालसर होईपर्यंत परतून घ्यावा.
वांगी भरल्या वांग्याची भाजी करताना चार भाग करून चिरतो तशीच चिरावीत.
तांदूळ तेलावर चांगला परतून घ्यावा.
भरल्या वांग्यासाठी मसाला :
लालसर भाजलेला कांदा, शेंगदाण्याचा कूट, हळद, गरम मसाला, धने, जिरे पूड, चवीपुरतं मीठ सर्व एकत्र करून थोड्या पाण्यानं भिजवून एकत्र करावं.
त्यात थोडी कोथिंबीर बारीक चिरून घालावी. हे सर्व मिश्रण वांग्यांमध्ये भरून घ्यावं.
एका पातेल्यात भातासाठी गरम पाणी करून घ्यावं. दुसऱ्या पातेल्यात थोडं तेल गरम करून कढीपत्ता तमालपत्र आणि हिंग-मोहरीची फोडणी करावी
फोडणी चांगली तडतडल्यावर त्यात भरलेली वांगी घालावीत. चांगली परतून घ्यावीत. त्यानंतर यात भाजून ठेवलेला तांदूळ घालावा व तोही परतून घालावा.
त्यानंतर त्यात गरम पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी.
पाण्याला उकळी आल्यावर पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर थोडं पाणी घालून भात शिजू द्यावा.
अर्धवट भात शिजत आल्यावर त्यात दोन चमचे चांगलं तूप घालून भात चांगला शिजू द्यावा.
Leave a Reply