कोशिंबीरचे प्रकार

कोशिंबीरचे प्रकार

1)चणाडाळ व काकडीची कोशिंबीर :*

अर्धी वाटी चण्याची डाळ तीन-चार तास पाण्यात भिजवा. मऊ झालेली डाळ मिक्‍सरमधून ओबडधोबड वाटा. त्यात लहान आकाराच्या तीन काकड्या चिरून घाला. हिंगाची फोडणी देऊन त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व साखर घाला.

*2) तोंडल्याची कोशिंबीर :*

*साहित्य:*

500 ग्रॅम तोंडली,
दाण्याचे कूट 6 टी-स्पून,
4 टी-स्पून नारळाचा चव,
1 लिंबाचा रस,
मीठ – साखर स्वादानुसार,
2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे,
तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर.

*कृती :*

तोंडली धुऊन स्वच्छ करावीत. मिठाच्या पाण्यात तोंडली किसावी. पाण्यातून कीस पिळून काढून घ्यावा म्हणजे तोंडल्याचा चिक निघून जातो. दाण्याचे कूट, कोथिंबीर, नारळाचा चव, लिंबाचा रस, मीठ, साखर हे घालून कालवा आणि वरून तेल, मोहरी, हिंग, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता घालून ही फोडणी त्यावर ओता व पुन्हा छान एकत्र करा. ही कोशिंबीर काकडीच्या कोशिंबिरीप्रमाणे छान लागते.

*टीप :*

लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता.

*3) मुळा, मुळ्याचा पाला व मुगाची डाळ :*

अर्धी वाटी मुगाची डाळ 3 ते 4 तास भिजवा. मुळ्याचा पाला बारीक चिरा. मुळा किसून घाला. डाळीचे पाणी काढून सर्व जिन्नस एकत्र करा. वरून तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करा. मिश्रणावर ओता. चवीनुसार मीठ व ओल्या नारळाचा चव घाला व लिंबू पिळा.

*टीप :*

मुळ्यापेक्षा त्याच्या पाल्यात सत्त्व असते.

*4) कारल्याची कोशिंबीर :*

*साहित्य:*

अर्धी वाटी कारल्याचे काप,
अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव,
1कांदा बारीक चिरलेला,
2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या,
थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली,
चवीप्रमाणे मीठ,
थोडा लिंबाचा रस,
तळण्यासाठी तेल.

*कृती :*

कारले बारीक चिरा आणि मिठाच्या पाण्यात 1 ते 2 तास ठेवा. नंतर पाणी काढून कारले पिळून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात कारले गुलाबी रंगावर तळा. तळलेल्या कारल्यामध्ये ओले खोबरे, मीठ, कांदा, मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस घालून कालवा.

*5) हुरड्याची कोशिंबीर :*

*साहित्य:*

1 वाटी हुरडा,
पाव वाटी नारळ चव,
साखर, मीठ चवीनुसार,
मिरची + लसूण पेस्ट,
कोथिंबीर.

*कृती :*

हुरडा उकडून घ्या. मिरची + लसूण वाटून घाला. नारळाचा चव, साखर, मीठ घालून एकत्र मिक्‍स करा.

*6) कोबीची कोशिंबीर (पचडी) :*

साधारण 1 वाटी पानकोबी किसून घ्या. त्यात 2 टेबलस्पून शेंगांचे कूट, मीठ, साखर चवीनुसार घाला. वरून हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करा. ओता. लिंबू पिळा. ही कोशिंबीर चवदार लागते.

*7) काकडीची कोशिंबीर :*

काकडी चोचवून घ्या. त्यात पंढरपुरी डाळे कुटून घाला. लिंबू, साखर, मीठ घाला. वरून जिरे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करा व त्यावर ओता. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

*8) कच्च्या टोमॅटोची कोशिंबीर :*

*साहित्य:*

2 कच्चे टोमॅटो,
खवलेला नारळ चव,
मिरपूड,
गोड दही,
मीठ,
साखर,
कोथिंबीर.

*कृती :*

टोमॅटो बारीक चिरा. पाणी सुटलेले काढून टाका. नारळाचा चव, मीठ, साखर, मिरपूड घाला. साईचे दही घाला. हलक्‍या हातांनी एकत्र करा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

*9) बिटाची कोशिंबीर :*

साल काढून बीट उकडून घ्या. नंतर किसा. त्यात अर्धी वाटी मोड आलेले मूग घाला. वरून मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फोडणी करा व त्यावर ओता. त्यात घट्ट दही घाला. चवीपुरते मीठ व साखर घाला. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

*10) गाजराची कोशिंबीर :*

*साहित्य:*

1 वाटी गाजराचा कीस,
2 टेबलस्पून शेंगांचा कूट,
1 हिरव्या मिरचीचे तुकडे,
3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक चिरून,
मीठ,
साखर,
कोथिंबीर.

*कृती :*

बाऊलमध्ये गाजराचा कीस, शेंगांचा कूट, मीठ व साखर घाला. तेलाची फोडणी करून हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लसूण बारीक चिरून घाला. ही फोडणी किसावर ओता. छान कालवून कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.

*11) मटकीची डाळ व पिकलेल्या टोमॅटोची कोशिंबीर :*

चार टोमॅटो बारीक चिरून घ्या. त्यात मटकीची डाळ 1 टेबलस्पून घाला. त्यात मीठ व साखर घाला. वरून तेलाची जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून ही फोडणी त्यावर ओता. टोमॅटोच्या रसात मटकीची डाळ छान भिजेल. ही कोशिंबीरसुद्धा छान.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.